भाई दि. बा.पाटील
भाई दि. बा.पाटील
दिनकर बाळू उपाख्य दि. बा. पाटील (जन्म : जासई-रायगड जिल्हा, १३ जानेवारी १९२६; मृत्यू : पनवेल, २५ जून २०१३) हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. बाळू गौरू पाटील हे त्यांचे वडील. ते शेतकरी आणि शिक्षक होते. दि. बा. पाटलांच्या आईचे नाव माधूबाई होते.
शिक्षण – दि. बां.च्या वडिलांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावांत शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता. असे असून दि. बा. पाटील यांचे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झाले. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांचे बंधू आत्माराम बाळू पाटील यांनीदेखील दि. बां.च्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला.
दि. बा. पाटील यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द
शेतकऱ्यांसाठीचे लढे
आज सिडकोने नवी मुंबई पूर्णपणे व्यापली आहे. याच नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळीत अष्टी किंवा चिरनेर येथे जे जोरदार लढे झाले त्या लढ्यासारखाच सिडको विरोधातला शेतकऱ्यांचाच्या हिताचा लढा दि. बा. यांनी लढवला. जासई येथील लढाईत पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला. रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते शेवटपर्यंत कष्टकऱ्यांसाठी लढले.